वीजबिल भरण्यासाठी 12 लाख वीजग्राहक ‘ऑनलाईन’
पुणे : महावितरणची वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या पुणे परिमंडलात 54 टक्क्यांवर गेली आहे. गेल्या महिन्यात 12 लाख 17 हजार वीजग्राहकांनी घरबसल्या 234 कोटी 44 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ केला आहे.
क्रेडीट कार्ड वगळता अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा निशुल्क करण्यात आला असून 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या पंधरवड्यात वीजबिलांची रक्कम भरलेल्या एकूण ग्राहकांपैकी 57 टक्के वीजग्राहकांनी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरलेले आहे.
पुणे शहरात गेल्या महिन्यात 7 लाख 11 हजार 497 (54.20 टक्के) ग्राहकांनी 135 कोटी 81 लाख रुपये, पिंपरी चिंचवड शहरात 3 लाख 23 हजार 422 (61 टक्के) 63 कोटी 34 लाख रुपये आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांमध्ये 1 लाख 82 हजार 950 (44.35 टक्के) वीजग्राहकांनी 35 कोटी 30 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे.
‘ऑनलाईन‘ बिल भरणा झाले निःशुल्क– क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.
‘ऑनलाईन‘ बिल भरल्यास 0.25 टक्के सूट– लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधीत ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी तसेच वीजबिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल ऍपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍपवरून वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.