पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोनिया गांधी या शतायुशी होवो व त्यांना चांगले आरोग्य लाभो याकरीता पुण्यामध्ये त्यांच्या वाढदिवशी सोमवार, दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये हा यज्ञ होणार आहे. यावेळी मिलिंद राहुरकर गुरुजी हे पौरोहित्य करणार असून पुण्यासह महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते मोठया संख्येने या यज्ञाकरीता उपस्थित राहणार आहेत. महामृत्युंजय यज्ञाच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवो, ही प्रार्थना देखील करण्यात येणार आहे.
मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २००४ साली देशाचे सर्वोच्च पंतप्रधानपद नाकारुन त्याग केला. अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना त्यांनी पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सांगितले. त्या वर्षीपासून हा सप्ताह साजरा केला जातो. यंदा सप्ताहाचे १५ वे वर्ष असून सोनियाजींच्या वाढदिवशी महायमृत्यंजय यज्ञ करुन त्या शतायुषी होवो, ही प्रार्थना करण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला यावे, असे आवाहनही त्यांने केले.