दृष्टिहीन मुलांनी लुटला हास्यप्रकारांचा मनमुराद आनंद
पुणे : आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व जगभरात पोहोचत असतानाच हास्ययोगाचे महत्त्व देखील सर्वदूर पसरत आहेत. समाजाच्या सर्वच वयोगटातील नागरिक हास्ययोगाच्या माध्यमातून ताण-तणाव दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे हास्यचळवळीतील हास्यक्लब मोठया संख्येने सुरु आहेत. मात्र, विशेष मुले या चळवळीपासून दूर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कोरेगाव पार्क येथील अंधशाळेत दृष्टिहीन मुलांचा महाराष्ट्रातील पहिला हास्यक्लब सुरु करण्यात आला. यावेळी तब्बल १०० हून अधिक दृष्टिहीन मुलांनी सहभाग घेत हास्यप्रकारांचा मनमुराद आनंद लुटला.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे पंधरावे वर्ष आहे. सप्ताहात कोरेगाव पार्क अंधशाळा येथे महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या हास्यक्लबचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी लाफ्टर योगा इंटरनॅशनल महाराष्ट्रचे अध्यक्ष हास्ययोगतज्ज्ञ मकरंद टिल्लू, माजी आमदार मोहन जोशी, कृष्णा शेवाळे, संदीप जगदाळे, विकास टिंगरे, प्रविण खंडाळकर, अविनाश वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी टिल्लू यांनी विद्यार्थ्यांना नमस्ते हास्य, तुरटी हास्य, बलून हास्य, बेली हास्य, मिरची हास्य, कौतुक हास्य, कारंजे हास्य, तबला हास्य असे हास्याचे विविध प्रकार शिकवित हास्याचे महत्व देखील सांगितले.
मकरंद टिल्लू म्हणाले, हास्य हे आनंदी मनाची स्थिती निर्माण करण्यास उपयोगी पडते. आनंदी मनाची स्थिती, जगण्याची परिस्थिती बदलते. म्हणूनच मुलांसारखे निरागस हास्य हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे. शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी हास्याचे व्यायाम महत्वाचे आहेत. टेन्शनने आयुष्य झाकोळते आहे. अशा वेळी हास्याच्या दृष्टीने आनंदाची सृष्टी निर्माण करता येईल. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहातंर्गत दृष्टीहिन मुलांच्या जीवनात हास्य फुलविण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या हास्यक्लबची सुरूवात करण्यात आली आहे, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, असे ही त्यांनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, महाराष्ट्राबरोबरच आता देशभरात हास्यक्लब वेगाने वाढत आहेत. चांगल्या आरोग्याबरोबरच आनंदी जीवनासाठी अनेकजण हास्यक्लबमध्ये सहभागी होतात. याचा फायदा दृष्टीहिन मुलांना देखील घेता यावा तसेच त्यांच्या जीवनात हास्य फुलविण्यासाठी या महाराष्ट्रातील पहिल्या हास्यक्लबचे उद्घाटन करण्यात आले आहे. हास्यक्लब वर्षभर सातत्याने सुरु राहणार आहे, असे ही त्यांनी सांगितले. प्रशांत सुरसे यांनी प्रास्ताविक केले. चेतन अग्रवाल यांनी आभार मानले.