शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीयन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या युवा याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या वतीने आयोजन
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीयन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या युवा म्हणजेच याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या वतीने उद्योजिका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २५ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता, नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
पुणे नॉलेज क्लस्टरच्या सल्लागार रश्मी उर्ध्वरेषे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी केंद्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
पुण्याच्या डॉ. आरोही कुलकर्णी यांना स्वयंसिद्धा पुरस्कार, ठाण्याच्या गौरवी कुलकर्णी यांना युवा उद्योजिका पुरस्कार तर अमेरिकेच्या डॉ विद्या जोशी यांना यशस्वी महिला -आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गेली बारा वर्षे सातत्याने ‘स्वयंसिद्धा’ व ‘युवा उद्योजिका’ हे पुरस्कार समाजामधील यशस्वी ब्राह्मण उद्योजिकांना दिले जात असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी महिलेला यंदापासूनच पुरस्कार देण्यात येणार आहे.
याशिवाय पुण्याच्या मधुरा बर्वे, रत्ना कुलकर्णी, श्रावणी काळे, पूजा भगरे, तर डोंबिवलीच्या मीनल गोडबोले यांना उद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उत्पादन, सेवा, शिक्षण, विक्री, संशोधन अशा क्षेत्रांमध्ये वेगळ्या वाटेवर जाऊन व्यवसायात यशस्वी होणाऱ्या महिलांची निवड या पुरस्कारांसाठी केली जाते.
कोणत्याही पाठवाबळा शिवाय उद्योगांमध्ये यश आणि कमीत कमी गुंतवणुकीवर कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या महिलांचे कर्तृत्व समाजासमोर आणण्यासाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.