पुणे, दि. २१ मार्च २०२३: छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या एजन्सीजच्या प्रतिनिधींना सर्व तांत्रिक व ‘ऑनलाइन’ प्रशासकीय कार्यवाहीची माहिती देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सोमवारी (दि. २०) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या महावितरणच्या निवडसूचीवरील एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (मास्मा) अध्यक्ष श्री. रोहन उपासनी यांनी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याकडे केली होती. ती लगेच मान्य करून एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी दिले.
गणेशखिंड येथील महावितरणच्य लघु प्रशिक्षण केंद्रामध्ये सोमवारी (दि. २०) झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत मुंबई मुख्यालयातील कार्यकारी अभियंता श्री. शरद बंड व सहायक अभियंता श्री. इकबाल खुर्शिद यांची विशेष व्याख्याते म्हणून उपस्थिती होती. त्यांनी पुणे, कोल्हापूर व सांगली येथील ४५ एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणासह ‘ऑनलाइन’ प्रशासकीय कार्यवाहीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच संबंधित प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी पुढाकार घेतला. ‘मास्मा’चे अध्यक्ष श्री. रोहन उपासनी व पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.
ग्रीन एनर्जीला प्राधान्य देत वीजग्राहकांकडून प्रामुख्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे पुणे परिमंडलातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच एजन्सीजच्या प्रतिनिधींसाठी देखील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी गती मिळेल व ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल असा विश्वास कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला.