पुणे-
महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षप्रारंभ सोहळा बुधवार २२ मार्च २०२३ रोजी पुण्यात संपन्न होत आहे. हा कार्यक्रम २२ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता माजी केंद्रीय मंत्री आणि ऋषीहुड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आणि लेखिका मृदुला भाटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याबरोबरच गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे कुलगुरू, लेखक आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.अजित रानडे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. याप्रसंगी बँकेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेचे मुख्य सभागृह, लायब्ररी बिल्डींगच्या वर शिवाजीनगर, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सीए डॉ.रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी दिली.
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या बनलेल्या आयरिश वंशाच्या मार्गारेट नोबल या युवतीने भारतात मानवसेवेचे त्यातही महिलांच्या उन्नतीसाठी मोठे काम केले. त्यांचे नामकरण भगिनी निवेदिता असे ठेवले गेले होते. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ २४ मार्च १९७४ रोजी प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट विवेक दाढे व त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी दाढे यांनी या बँकेची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यंदापासून सुरु होत आहे. संपूर्ण महिलांनी चालवलेली ही बँक हे या बँकेचे वैशिष्ट्य आहे.
१९७४ मध्ये सव्वा दोन लाख रुपयांच्या ठेवींनी २०२२ सालापर्यंत तब्बल ९१८ कोटींचा आकडा गाठला. १९७४ च्या ३.५ लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम २०२२ पर्यंत ५१४ कोटींना पोहोचली. सातत्याने १८ वर्षे बँकेने १५ % लाभांश दिला आहे. आज पुणे व सातारा जिल्ह्यात मिळून बँकेच्या १८ शाखा कार्यरत आहेत. अनेक पुरस्कारांनी बँकेला सन्मानित करण्यात आले आहे.