– ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना प्रदान
पुणे दि. ५ मार्च, २०२३ : ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ यावर्षी डॉ अलका देव मारुलकर यांना प्रदान करीत गानसरस्वती महोत्सवात आज त्यांचा सन्मान करण्यात आला. तर ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज महोत्सवाच्या तिसऱ्या व शेवटच्या सत्रात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त दाजीशास्त्री पणशीकर, किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर आदी यावेळी उपस्थित होते.
रोख रु. ५१ हजार व मानचिन्ह असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे तर रोख रु. २५ हजार व मानचिन्ह असे किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराचे स्वरूप असून सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता सदर पुरस्कार देण्यात येतात.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ओंकार गुलवाडी यांनी पुरस्कार आपल्या गुरुंना समर्पित करीत आयोजकांचे आभार मानले. तर डॉ अलका देव मारुलकर यांनी किशोरीताई आणि त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मोगुबाई आणि माझे वडील राजाभाऊ देव यांचे चांगले ऋणानुबंध होते. मोगुबाई यांना त्यावेळी स्मृतीभ्रम झाला होता, त्यामुळे त्या आम्हाला ओळखतील की नाही हे सांगता येत नाही असे किशोरीताई यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवले होते. मात्र आम्ही केवळ त्यांच्या दर्शनासाठी गेलो. पण खोलीत पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांनी बाबा आणि मला ओळखले. माझा रियाज कसा चालू आहे याचीही विचारपूस त्यांनी केली. यावरून जन्म जन्मांतरीच्या नात्यांवर आमचा विश्वास बसला.” मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाने आज मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा असून या दोन्ही कलाकारांवर केलेली स्वरचित राग श्री मधील ‘कैसे बरनू तुम्हरी महिमा…’ ही बंदिश त्यांनी उपस्थितांसमोर म्हटली.
दाजीशास्त्री पणशीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.