पुणे : रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्यातर्फे आयोजित २१ व्या मोफत हॅन्ड व प्लास्टिक सर्जरी शिबिरात १३१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. चाळीसगाव येथील डॉ. अमित जैन यांच्या महावीर रुग्णालयात हे शिबीर झाले. शिबिराचे हे २१ वे वर्ष होते. जन्मजात आलेले अपंगत्व, भाजल्याने आलेले अपंगत्व, वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आली.
पुण्यातील प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांच्या नेतृत्वात मुंबईतील प्लास्टिक सर्जन डॉ. शंकर सुब्रह्मण्यम, औरंगाबाद येथील डॉ. अविनाश येळीकर, नाशिकमधील डॉ. प्रशांत मुन, गोव्यातील भूलतज्ज्ञ डॉ. नोएल ब्रिट्टो यांनी दोन दिवसांत शस्त्रक्रिया केल्या. वैद्यकीय संचालक डॉ. उज्ज्वल देवरे यांनी सर्व टीमचे कौतुक केले. शिबिराच्या उद्घाटनासाठी रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचे कौतुक करत हे शस्त्रक्रिया शिबीर त्यांच्या भागातही आयोजित करणार असल्याचे सांगितले. या उपचारांमुळे अशा रुग्णांना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. जळगाव, शहादा, पुणे, शिरूर, वडूज येथेही असे शिबीर आयोजित करण्यात येते, असे डॉ. पंकज जिंदल म्हणाले.