– विजेत्यांचा पहिलाच सामूहिक सन्मान
– महापौर मोहोळ यांची संकल्पना
कोथरुड (प्रतिनिधी)-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेल्या पुणेकर दिग्गजांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे सन्मान केले गेले. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पुणेकरांचा हा पहिलाच एकत्रित सन्मान करण्यात आला.
कोथरूड येथील जीत मैदानात महापौर मोहोळ संयोजक असलेल्या कबड्डी स्पर्धेत हा सन्मान करण्यात आला. शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार विजेते सिंहात कांबळे, हर्षल वखारिया, अर्पणा प्रभुदेसाई, साक्षी माथवड, अभिजित कटके, अंकिता गुंड, प्रियंका खेडकर, अर्चना आढाव, रुचिका भावे, संयोगिता घोरपडे यांच्यासह शिवछत्रपती राज्यक्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते नितीन बत्री, जगदीश नानजकर आणि शिवछत्रपती राज्यक्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे यांना महापौर मोहोळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक राहुल भंडारे, किरण दगडे-पाटील, उमेश गायकवाड, सचिन दोडके, हर्षाली माथवड, सोनाली लांडगे, मंजुश्री खर्डेकर, श्रध्दा प्रभुणे, सविता वाडकर, मोनिका मोहोळ, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, क्रीडा उपायुक्त संतोष भोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्व विजेत्यांना सन्मानित केल्यानंतर अभिनंदन करत महापौर मोहोळ म्हणाले की, ‘पुण्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्यात पुणे शहराने क्रीडा क्षेत्रामध्ये देशाला, राज्याला अनेक प्रतिभावंत खेळाडू दिले आहेत. त्यात हा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सन्मानाने पुण्याच्या क्रीडा वैभवात भरच पडली आहे.’