अखेर पुणे शहराच्या स्मार्ट_सिटी वर स्मार्ट फ्लॉप शो म्हणून शिक्कामोर्तब…
पुणे: स्मार्ट शहर करण्यासाठी 1000 कोटीचे अनुदान नेमके कुठे खर्च केले? याचाच हिशेब द्या असे आवाहन करत स्मार्ट सिटी चा शो फ्लॉप झाल्याचा आरोप स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदमांनी केला आहे.
त्या म्हणाल्या, “केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये राष्टवादीची सत्ता असताना व मी अश्विनी नितीन कदम स्थायी समिती अध्यक्षा असताना देशात द्वितीय स्थान प्राप्त झाले होते. पण तत्कालीन सत्ताधारी यांच्या कार्यकाळात स्मार्ट पुणे शहराचे मिशन असफल ठरल्यानं, व्याजाचे ६५ कोटी केंद्र शासनाने परत घेतले. यामुळे स्मार्ट सिटी कंपनीवर उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासन तसेच पुणे मनपा यांच्याकडे मदत मागण्याची नामुष्की ओढवली.
केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत, १०० शहरांकडून विकासासाठीच्या योजनांचे आराखडे मागावून त्यांनुसार निधी देण्यात येणार होते. दुसरा क्रमांक पटकावून १००० कोटी मिळालेल्या पुणे शहरातील तत्कालीन सत्ताधारी यांनी त्या निधीचा उपयोग नक्की कुठल्या विकास कामासाठी केला हेच कळत नाही. केंद्राकडून आलेल्या या निधीचा सामान्य पुणेकरांना काहीच उपयोग झाला नाही. कागदावरचे आराखडे आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यात खूपच तफावत आहे.
एवढी रक्कम मिळवूनही पायाभूत सुविधांचाही पत्ता नाही, रस्त्यांवरील खड्डे, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सामान्य पुणेकर अतिशय हैराण आहे. तत्कालीन महापौरांनी या प्रकल्पाचा हवाला देत, स्मार्ट सिटी पुण्याची स्वप्न दाखवत, पुणेकरांची एकाप्रकारे फसवणूकच केली. आता हे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता खाजगी संस्थांची मदत घेण्यापासून गत्यंतर नाही.
केंद्र शासनाकडून मिळालेल्या त्या निधीचा हिशेब पुणेकरांना मिळणार का ?
नाहीतर पुणे शहराला स्मार्ट बनवण्यात तत्कालीन सत्तधारी सपशेल अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल. असे कदमांनी म्हंटले आहे.