गोल्डन मेमरीज प्रस्तुत कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘जीवनगाणे’ हा सांगीतिक कार्यक्रम
पुणे : जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी… नभ उतरू आलं… आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर… लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला… अशा अविट गोडीच्या सूर आणि संगीताचा अप्रतिम मिलाप असलेल्या गाण्यांचे सादरीकरण आणि रानकविता यामधून ज्येष्ठ रानकवी ना.धो. महानोर यांचे ‘जीवनगाणे’ कलाकारांनी उलगडले.
गोल्डन मेमरीज प्रस्तुत कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ज्येष्ठ रानकवी ना.धो.महानोर यांच्या जयंतीनिमित्त ‘जीवनगाणे’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात करण्यात आले होते. कार्यक्रमात गायक आणि वादकांनी महानोर यांच्या कविता आणि चित्रपट गीतांच्या माध्यमातून त्यांचा गीत प्रवास आणि कविता लेखन रसिकांसमोर उलगडून दाखवले.
चैत्राली अभ्यंकर, राहुल जोशी, मीनल पोंक्षे, हेमंत वाळुंजकर या गायकांनी ना.धो.महानोर यांच्या गीतांना अप्रतिम आवाज देत रसिकांना मंत्रमुग्ध केले. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी अनेक प्रसंग सांगून महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ नरेंद्र चिपळूणकर, तुषार दीक्षित, ओंकार पाटणकर, डॉ राजेंद्र दूरकर, राजू जावळकर, केदार मोरे, प्रतीक गुजर यांनी अप्रतिम साथ सांगत केली. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन मोहित नामजोशी यांनी केले. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती आणि सादरीकरण चैत्राली अभ्यंकर यांनी केले.
शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर… हे गीत सादर करीत कलाकारांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर जैत रे जैत, एक होता विदूषक, अजिंठा अशा चित्रपटांसाठी महानोर यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांचा चित्रपट प्रवास, लेखन प्रवास आणि एक प्रकारे आयुष्याचा प्रवास रसिकांसमोर मांडला. मी रात टाकली, लाल पैठणी, अवेळीच केव्हा दाटला अंधार, बाळगू कशाला ही गीते रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली.
अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेड गावामध्ये गेलेले महानोर यांचे जीवन, बालकवींच्या कविता ऐकून लागलेली साहित्याची आवड, महानोर यांच्या कविता वाचून पु. ल. देशपांडे यांनी त्यांना कविता लेखनासाठी दिलेले प्रोत्साहन, जैत रे जैत च्या माध्यमातून लता मंगेशकर आणि इतर मंगेशकर कुटुंबाशी त्यांचा आलेला संबंध, त्यातून त्यांचा बहरत गेलेला लेखन प्रवास अशा एकापेक्षा एक रोमांचकारी प्रसंगाच्या माध्यमातून कलाकारांनी महानोर यांचे साहित्य गीत आणि संगीताच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले.