अखिल मंडई मंडळातर्फे आयोजन
पुणे : गणेशोत्सवात आकर्षण असते ते देखाव्यांचे. पुण्यातील गणेशोत्सवातील भव्य सजावट, देखावे पाहायला जगभरातून लोक येतात. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला साजेसे असे देखावे साकार करण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी ही देखावे तयार करणाऱ्या कलाकार आणि कलादिग्दर्शकांवर असते. अखिल मंडई मंडळाच्या वतीने भव्यदिव्य देखावे साकारणाऱ्या कलाकारांचा आणि कलादिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला.
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षिका स्वाती पंडित, रवींद्र रणधीर, नितीन गुजराथी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कल्याणी सराफ, माला रणधीर, पराग गुजराती, सूरज थोरात उपस्थित होते.
विवेक खटावकर, अमन विधाते, सिद्धार्थ तातुसकर, गिरीश कोळपकर, विशाल ताजनेकर, संदीप गायकवाड, संदीप इनामके, महेश रांजणे, महेश साळगावकर, क्षितिज रणधीर, मिथिलेश कुमार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
विवेक खटावकर म्हणाले, गणेशोत्सवाची सजावट तयार करणारे कलाकार हे इंजिनियर आहेत त्यांचा गौरव होणे ही महत्त्वाची बाब आहे. गणेशोत्सवानिमित्त त्यांची कला बाप्पा पुढे सादर होत असते.
आनंद सराफ म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सवामध्ये भव्य दिव्य देखावे निर्मात्या कलाकारांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे असते. दिवस-रात्र मेहनत करून स्वप्न सृष्टी निर्माण करणाऱ्या कलाकार दिग्दर्शकांचा उत्सवापूर्वी व्यवहारापलीकडे जाऊन सन्मान करणे ही प्रथा या निमित्ताने सुरू होत आहे.