‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन आर्किटेक्चरल प्रॅक्टिसेस’ चर्चासत्र उत्साहात
‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज’ या संस्थेतर्फे ‘गोल्डन डायलॉग्स’ ला प्रतिसाद
पुणे :
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मानवी कौशल्याचा संगम व्हावा, त्यातून उत्कृष्ठतेची कास धरावी, बेरोजगारीची भीती बाळगू नये’, असा सूर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन आर्किटेक्चरल प्रॅक्टिसेस’ या चर्चासत्रात उमटला.
‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज’ या संस्थेतर्फे ‘जनरेटिव्ह डिझाईन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन आर्किटेक्चरल प्रॅक्टिसेस’ या विषयावर संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते.
शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर निगडित सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी ‘गोल्डन डायलॉग्स’ या संवादमालेचे आयोजन करण्यात आले असून त्यातील हे चौथे संवादसत्र १५ सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट(विधी महाविद्यालय रस्ता, पुणे )येथे पार पडले .या संवादसत्रात आर्किटेक्ट कृष्ण मूर्थी (मुंबई),आर्किटेक्ट आदित्य चंद्रा (मुंबई),आर्किटेक्ट भैरूमल सुतार(पुणे) या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले . आर्टिफिशयल इंटेलिजन्स च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या डिझाईन चे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
आर्किटेक्ट हृषीकेश कुलकर्णी यांनी चर्चासत्राचे मॉडेरेटिंग केले. प्रियल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पूर्वा केसकर यांनी आभार मानले.व्हीके (ऑपरेशन्स)च्या संचालक सौ.अपूर्वा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेयर्स असोसिएशन’ आणि ‘व्हीके ग्रुप ‘ च्या सहकार्याने ही संवादमाला आयोजित करण्यात आली.
आदित्य चंद्रा म्हणाले,’आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक डिझाईन ऍप आले आहेत .ज्यांचा वापर करून आर्किटेक्ट आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील.
‘सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आरंभ युगात आहोत. जस जसं हे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत जाईल, तसं अनेकांवर बेकारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, जसं की रिसेप्शनीस्ट, हिशोबनीस, प्रिंटर्स, पब्लिशर्स, ऑफिस सहकारी, डिझाईनर, डिझाईन व्हिज्युअलायझर अशा अनेकांची कामे कमी होतील वा बंदही होऊ शकतात’, असेही त्यांनी सांगीतले.
कृष्णा मूर्ती म्हणाले,’
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणात मंदी वा बेकारी येईल असे काही होण्याची शक्यता वाटत नाही, कारण कामं आणि ग्राहक आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहेत, जी करायला प्रत्यक्ष मनुष्य बळाची गरज लागणारच आहे, त्यामुळे बेकारी येईल किंवा आपण जॉबलेस होऊ ही भीती बाळगण्याचे कारण नाही’.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्याला डिझाईन मध्ये सहाय्य होणार असले तरी आर्किटेक्ट लोकांनी स्वतः मशिनरीवर लेबर वर्क करण्याची लाज बाळगली नाही पाहिजे. स्वतः मशिनरीवर काम केले तरच आपण अधिक प्रगती करू शकतो हे प्रत्येक आर्किटेक्टने लक्षात ठेवले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
‘बांबू सारख्या पर्यावरण पूरक व शाश्वत घटकांचा वापरही सध्या फर्निचर आणि बांधकाम व्यावसायात अधिक प्रमाणात होऊ लागला आहे’, असे मत सुतार यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ही संवादमाला आयोजित करण्यात आली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन आर्किटेक्चरल प्रॅक्टिस या संवादसत्रात आर्किटेक्ट कृष्ण मूर्ती, आदित्य चंद्रा आणि भैरुमल सुतार यांनी त्यांनी केलेल्या कामाचे प्रेझेन्टेशन केले.
ए आय. चा वापर करून अगदी जगावेगळी अद्भुत अशी वास्तुकलेतील डिझाईन, रचना करता येऊ शकतात, हे चंद्रा यांनी आपल्या काही निवडक निवासी व व्यवसायिक बांधकाम प्रकल्पाद्वारे दाखवून दिले.
आय ए. द्वारे एखादे मूळ प्राचीन भारतीय डिझाईन स्पॅनिश पद्धतीने कसे होऊ शकते हे आय. ए. आपल्याला दाखवू शकते, असे चंद्रा यांनी सांगितले.
आज आर्किटेक्चरल डिझाईन मध्ये इतके सारे ऍप्स आपल्या मदतीला आहेत की त्या द्वारे आपण एका क्षणात एका रचनेची वेगवेगळी रुपे उलगडून पाहू शकतो, ग्राहकांना निवडीसाठी दाखवू शकते, असेही चंद्रा म्हणाले.
Finch, SmartVid.Io, ARK, अशी एक ना अनेक ऍप्स आपल्या मदतीला आहेत. मात्र या असंख्य ऍप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे डिझाईनचे काम सोपे झाले असले तरी यापुढे हाताने डिझाईन करणार्यांचे काम कमी होणार हे नक्की, असे मत चंद्रा यांनी व्यक्त केले.आपल्या मनातील रचना, फोटो, इमेजेस पुरवून आपण ए. आय. कडून अपेक्षित डिझाईन मिळवू शकतो आणि मिळालेल्या रचनांमध्येही हवे ते बदल करू शकतो, ए. आय. कडून डिझाईन करून घेणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कुशल मनुष्यबळ, कामगारांचीच आवश्यकता असते,असे मत मूर्ती यांनी व्यक्त केले.