केशव शंखनाद पथक पुणेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘केशव सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा पुणे : भारत देशाला महान विचारधारा लाभली आहे. आज ती चुकीच्या दिशेने जात आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये चर्च असते तेथे बायबल शिकवले जाते, तर उर्दू शाळांमध्ये कुराण शिकवले जाते. पण हिंदू शाळांमध्ये मंदिर चालत नाही आणि तेथे गीता शिकवली जात नाही. आपणच आपल्या संस्कृतीला कमी लेखत आहोत. धोतर नेसणे, कुंकू लावणे हे आपल्याला कमीपणाचे वाटू लागले आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी आपणच खंबीरपणे आणि धाडसाने पुढे येण्याची वेळ आली आहे, असे मत इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष श्वेतदिप दास उर्फ संजय भोसले यांनी व्यक्त केले.
केशव शंखनाद पथक पुणे यांच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे ‘केशव सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सांगली जिल्हातील सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन, सचिव किशोर चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत चिल्लाळ, कोषाध्यक्ष रणजित हागवणे आदी उपस्थित होते. यावेळी आकाश जाधव यांच्या वतीने पूर्णानंद गर्दे यांनी हा पुरस्कार स्विकारला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
किशोर चव्हाण म्हणाले, कोणतीही गोष्ट सुरू केली की त्यामध्ये सातत्य असणे महत्वाचे आहे, तर आपण टिकून राहतो. शंखवादन सुरू करून त्याचे पथकात रूपांतर करणे, फक्त इथेच न थांबता तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचा सन्मान करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. पुढील वर्षी विश्व हिंदू परिषदेस ६० वर्ष पूर्ण होत आहेत ,त्यानिमित्ताने सुमारे २००० संख्यने शंख वादन करून विश्व विक्रम करूयात, असेही त्यांनी सांगितले.
नितीन महाजन म्हणाले, हिंदुस्थानातील पहिले शंख वादन करणारे शंख पथक म्हणजे केशव शंखनाद पथक आहे. देवळात आरती पूजा कशी करायची हे सांगण्यासाठी हळूहळू मंदिरात लोकांना जमवायला सुरूवात केली आणि तिथूनच शंखनादला सुरूवात झाली. शंखनाद कसा करायचा, त्याचे शारिरीक आणि धार्मिक महत्व समजून सांगायला सुरूवात केली. त्यावेळी शंखवादना बद्ल लोकांमधील अनेक गैरसमज दूर केले आणि त्याची वाटचाल सुरू ठेवली. हे पथक सुरू झाल्यानंतर फक्त वादनासाठी मर्यादित न ठेवता विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केली, असेही त्यांनी सांगितले. मनीषा पुरकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत हगवणे यांनी आभार मानले.