: शंभर शालेय विद्यार्थी ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची घेणार शपथ
पुणे : सन १९२० पूर्वी मुठा नदी ओलांडण्यासाठी पुण्यात फक्त दोन पुल होते. याच काळात भांबुर्डा गावठाणात वस्ती वाढत होती. म्हणून त्या वेळच्या ब्रिटिश शासनाने शनिवारवाड्यासमोर नवीन पूल बांधण्याचे ठरवले, १९२० च्या जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरू होऊन १७ सप्टेंबर १९२३ रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन झाले.
इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने या शिवाजी पूलाचा शंभरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन केले जाणार असून श्री शिवाजी प्रिपेअेटरी मिल्ट्री स्कूलचे शंभर शालेय विद्यार्थी ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेणार आहेत. शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी १२ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपस्थितांना पूलाची माहिती देणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंजळे यांचे वारसदार विनित केंजळे, इतिहास अभ्यासक मंदार लवाटे उपस्थित राहणार आहेत.
मोहन शेटे म्हणाले, शिवाजी पूल ब्रिटिशांनी बांधला असला तरी, त्याच्या बांधकामात एका मराठी व्यक्तीचे योगदान खूप मोठे होते. रावबहादुर गणपतराव महादेव केंजळे यांच्या देखरेखीखाली या पुलाचे बांधकाम झाले. केंजळे हे निरक्षर होते पण स्थापत्य कलेतील त्यांचे ज्ञान अभियंत्यापेक्षाही मोठे होते. पूर्वी लॉइड ब्रिज या नावाने ओळखल्या जाणान्या या पूलाचे खरे नाव शिवाजी पूल असे आहे. काहीजण नवा पूल म्हणतात, छत्रपती किंवा काॅर्पोरेशन पूल असेही म्हटले जाते. पानशेत जलप्रलयासारख्या संकटाशी टक्कर देत उभा असलेला हा पूल गेली १०० वर्ष पुणेकरांची सेवा करत उभा आहे.