सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश
पुणे, दि. १३ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी बुधवारी दिली.
रा. स्व. संघ समन्वय समितीच्या दि. १४, १५, १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. आंबेकर बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यावेळी उपस्थित होते.
श्री. आंबेकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करत असतात. दैनंदिन शाखेच्या कामाबरोबरच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात संघाचे कार्यकर्ते विविध सामाजिक कामांमध्ये मग्न असतात. ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत.
बैठकीत सहभागी होणार्या सर्व संघटना संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य व त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात. उदा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. अशाप्रकारच्या सामूहिक कामावरही बैठकीमध्ये चर्चा होते, अशी माहिती श्री. आंबेकर यांनी दिली.
समाजासमोर जी आव्हाने येतात त्यांचा विचार करून कार्याची दिशा
निश्चित केली जाते आणि हे कार्य राष्ट्रीय भावनेतून केले जाते, ज्यातून कामाचा वेग वाढेल. जवळपास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या साऱ्या संघटना अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रिय असून त्यांनी आपल्या परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीत मांडतील. तसेच राष्ट्रीय आणि वर्तमान परिस्थितीच्या संदर्भातील अनुभव देखील सांगितले जातील. त्यासंबंधित अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असेही श्री. आंबेकर म्हणाले.
पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह श्री. दत्तात्रेयजी होसबाळे, तसेच डॉ. कृष्णगोपालजी, डॉ. मनमोहनजी वैद्य, श्री. अरुण कुमारजी, श्री. मुकुंदाजी आणि श्री. रामदत्तजी चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
श्री. आंबेकर म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे.
दरवर्षी समन्वय बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षीची बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे झाली होती.

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा-सुनील आंबेकर
About the author

SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/