पुणे, दि. १३ सप्टेंबर २०२३: वीज ही मूलभूत गरज आहे आणि वीजक्षेत्रात सेवा देताना कर्मचारी हितासह वीजग्राहकांचे हित देखील महत्वाचे आहे. राज्य शासनाच्या वीज कंपन्यांतील सर्व कर्मचारी संघटनांना त्याची जाणीव आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांनी अनेक अडथळ्यांवर मात करून देशाच्या वीजक्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे त्यात सर्व कर्मचारी संघटनांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले.
येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियनने ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, केंद्रीय सरचिटणीस श्री. रवींद्र देवकांत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. भागवत थेटे व श्री. रवींद्र आव्हाड उपस्थित होते.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियनच्या वतीने या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणारे विख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रवींद्र कसबेकर, शिवचरित्रकार व किर्तनकार ह.भ.प. श्री. रोहिदास हांडे तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खोखो पटू व महावितरणचे तंत्रज्ञ श्री. प्रतिक वाईकर यांचा मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक श्री. तानाजी शेंडकर यांनी केले तर श्री. बाबासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियनच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.