सेवा आगळी बुद्धिदाता
कृपा राहावी हे सुखकर्ता…
आज अवघ्या विश्वात प्रदूषणाच्या विघ्नाचा विळखा घट्ट होत असताना विघ्नहर्त्याचे नमनही पर्यावरण पूरक पध्दतीने करणे, आवश्यक बनले आहे. याचसाठी ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्यातर्फे कर्वेनगर-वारजे प्रभागात दरवर्षी पर्यावरण पूरक पध्दतीने गणेश मूर्ती साकारण्याच्या शिबीर दरवर्षाप्रमाणे यंदाही होते आहे.
स्वप्नील दुधाने या संदर्भात सांगितले कि,’ सोमवार, दि. ११ सप्टेंबर ते रविवार, दि. १७ सप्टेंबर या कालावधीत कर्वेनगर-वारजे प्रभागातील इच्छुक सोसायटींमध्ये हा उपक्रम संपन्न होत आहे. यावेळी गणेश मूर्तीसाठी लागणारी सामग्री पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करण्यात आली असून सर्व वयोगटातील नागरिकांनी उपक्रमात सहभागी होत पर्यावरण रक्षणार्थ आयोजित उपक्रमात खारीचा वाटा उचलणे अपेक्षित आहे.
या उपक्रमाचे आयोजन गेल्या दोन दिवसात गोल्डन पेटल्स सोसायटी, तपोवन सोसायटी व स्नेहांकित कॉलनी या सोसायटींमध्ये तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल व कै. पाटलू चौधरी शाळा या दोन मनपाच्या शाळांमध्ये करण्यात आले होते. यावेळी सर्वच नागरिक, विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षक वृंदाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
आपल्या धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचे काम वर्षभरात येणारे सणवार करत असतात, परंतु ते साजरे करत असताना निसर्गाशी असणारी नाळ तुटू न देणे आवश्यक असते. दरवर्षी प्लास्टरच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण आपणांस नवे नसून यावर आपल्या पातळीवर उपाययोजना करणे, हे एक जागरूक नागरिक या नात्याने आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. तब्बल १५०० पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी नक्कीच उपयुक्त असून अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी होत आपले जागरूक नागरिक या नात्याने असणारे कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे.असेही दुधाने म्हणाले .