अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३० वे वर्ष : गुरुपरंपरेचे दर्शन घडविणारी भव्य सजावट
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदा गुरू परंपरेची महती सांगणारी भव्य सजावट केली जाणार आहे. श्री दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री टेंबे स्वामी महाराज, श्री माणिकप्रभू महाराज आणि श्री स्वामी समर्थांची १२ फूट भव्य मूर्ती असे गुरू परंपरेचे दर्शन देखाव्यामधून होणार आहे. ६० फूट बाय ८० फूट या भव्यमंडपामध्ये ‘स्वामी दरबार’ हा देखावा उभारण्यात येत आहे. अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारला जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र पांडे व इतर ३२ कलाकार २ महिने काम करीत आहेत. देखाव्यासाठी सुमारे १ हजार टन लोखंड, ३०० पोती प्लॅस्टर ऑफ पॅरिस, १ हजार किलो फायबर, प्लायवूड इत्यादी साधनांचा वापर करण्यात आला असून खास हाताने पेंटींग केलेल्या गुरूप्रतिमा व श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती तसेच आकर्षक रंगसंगती व मनमोहक रोषणाई हे देखाव्याचे मुख्य आकर्षण आहे.
अण्णा थोरात म्हणाले, आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये गुरू व गुरूपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच गुरूपरंपरेचे दर्शन यंदाच्या देखाव्यामधून भाविकांना होणार आहे. श्री दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री टेंबे स्वामी महाराज, श्री माणिकप्रभू महाराज यांच्या प्रतिमांचे पेंटींग केलेले थ्रीडी कटाऊट व श्री स्वामी समर्थांची १२ फूट भव्य मूर्ती असे या देखाव्याचे स्वरूप असणार आहे.