पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची शहरातील 58 वी “मोक्का”कारवाई
पुणे – येरवडा परिसरात खंडणीची मागणी करून गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी साथीदारांसोबत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरफोडी, बेकायदेशीर जमाव जमवणे, धारदार हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे असे वारंवार गुन्हे करणाऱ्या हुसेन उर्फ सोन्या युनुस शेख याच्यासह नऊ जणांच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी “मोक्का” अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीमध्ये पाच वीर संघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांनी केलेली शहरातील ही 58 वी कारवाई आहे. येरवडा भागातील आतापर्यंत सात टोळ्यांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यावर्षी करण्यात आलेली संघटित गुन्हेगारीच्या टोळी वरील ही तिसरी कारवाई आहे. हुसेन उर्फ सोन्या शेख, रुपेश उर्फ दाद्या राजगुरू व त्याच्या इतर साथीदारांनी जुनी भांडण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागत इराणी मार्केट येरवडा येथे धारदार शस्त्र हातात घेऊन खिडक्यांच्या काचा फोडून मोठी दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी वसीम हैदर अली मोगले (वय 22) व अमीर उर्फ संख्या युनूस शेख (वय 18, दोघे ही रा. लक्ष्मी नगर येरवडा ) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. टोळीप्रमुख हुसेन उर्फ सोन्या शेख याच्यासह तीन आरोपी फरारी असून यामध्ये पाच विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. या टोळीवर प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा वारंवार गुन्हे केलेले आहेत. येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी यासंदर्भातील प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम “मोक्का” कायद्यानुसार कारवाई करण्याला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कुमार वारंगुळे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, प्रकाश चौधरी, देविदास वांढरे यांनी ही कारवाई केली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अशा सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांवर कारवायांचा धडाका लावलेला आहे. शहरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने कारवाया सुरू असल्यामुळे गुन्हेगारीवर देखील वचक निर्माण झालेला आहे. पोलीस आयुक्तांनी पुणे शहरात केलेली मोक्का अंतर्गत केलेली 58 वी कारवाई आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवरील कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.