सायबर सुक्षेबाबत जागृत राहण्यासाठी महिलांना केले मार्गदर्शन.
पुणे दि.९: नागरिक आपल्या कामाला महत्व देत असतात. जे काम करताल ते शक्य तेवढे संसदीय व विधायक मार्गाने करावे. सामाजिक क्षेत्रात काम करताना समोरच्याशी वाद घालत बसणे योग्य नाही. त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क करून ती समस्या सोडविणे महत्वाचे आहे. एकमेकांच्या मदतीने लोकांची समस्या सोडवण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
आज पुणे येथील विद्यार्थी सहाय्यक समिती हॉलमध्ये स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला दक्षता समिती व महिला स्वयंसेवकांना प्रशिक्षण व ओळखपत्राच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त मा. श्रीमती जेहलम जोशी व शारदा वणवे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ज्या एकल महिला आहेत त्यांच्याबद्दल मदतीची भूमिका ठेवली पाहिजे. महिला अत्याचाराच्या बाबतीत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असल्याची खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे. संस्थेच्यावतीने दरवर्षी १०० ते १५० महिलांना पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागातील महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना स्त्री आधार केंद्राचे ओळखपत्र दिले जाते. गणेशोत्सव, नवरात्र या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी स्त्री आधार केंद्राच्या महिला स्वयंसेवक म्हणून पोलिसांसोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ओळ्खपत्राचा कोणीही गैरवापर करताना आढळल्यास तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
महिलांनी सायबर सुरक्षतेबाबत काय काळजी घ्यावी याबाबद्दल मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील पासवर्ड सशक्त असावेत अकाउंट लॉगिन करताना पासवर्ड ब्राउझर मध्ये सेव्ह करू नयेत. तसेच टू फॅक्टर ऑथेंटीकेशन सुरू ठेवावे संशयास्पद लिंक्स, फोन कॉल्स पासून सावध रहावे, सुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा वापर करावा आर्थिक व्यवहार करताना सार्वजनिक वाय-फायचा वापर करणे टाळावे, महत्त्वाचा असलेल्या फाइल्स डेटा नियमितपणे बॅकअप घेऊन ठेवावा, आपल्याकडील संगणक, मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी फायरवॉलचे बटन सुरू करून ठेवावे, सोशल मीडियावरील अकाउंट लॉक करून ठेवणे, सोशल मीडिया अकाउंट लॉग आऊट केले आहे का नाही हे तपासणे, अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. अशा व्यक्तींना एकटे भेटणे टाळावे, आपला वेबकॅम बंद आहे का याची खात्री करून घेणे, इंटरनेटवरील फुकट उपलब्ध असणारे अनोळखी गेम्स – ॲप्स डाऊनलोड करणे टाळावे. त्यामधून व्हायरस आपल्या मोबाईल, संगणकात येऊ शकतो, घरातील स्मार्ट डिव्हाइसेस अल्पवयीन मुले वापरत असतील तर पेरेंटल कंट्रोल सेटिंग चा वापर करावा अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना दिल्या.या सर्व मुंबई पोलीस व महाराष्ट्र सायबर कक्षाने विधीमंडळात पटलावर ठेवलेल्या एसओपी आहेत असे नीलमताईं गोर्हेंनी सांगितले .
अप्पर पोलीस आयुक्त श्री. प्रवीणकुमार पाटील म्हणाले, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी स्त्री आधार केंद्राची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली आहे. इंटरनेटचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर क्राईम घडू नये याबाबत काय काळजी घ्यावी याची माहिती सर्वांना असली पाहिजे. आजच्या काळात इंटरनेट, सोशल मीडिया सर्वांसाठी आवश्यक झालेला असला तरी त्यावर व्यक्त होताना लोकांनी स्वतःला थोडी बंधनं घालून घ्यावीत. महिलांवर अत्याचार झाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा नोंदवला पाहिजे. त्यामुळे त्याभागाची पाहणी करून गुन्हगाराला लवकरात लवकर पकडण्यास मदत होते.
सायबर क्राईमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. मीनल पाटील म्हणाल्या, वर्क फ्रॉम होम, कर्ज घेण्याचे संदेश, महावितरणच्या नावाने संदेश पाठविणे यांसारख्या अनेक माध्यमातून लोकांना खोटे संदेश पाठविले जातात. त्यामधून लोकांना आमीष दाखवले जाते आणि लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जाते. त्यातून लोकांचे खोटे फोटो, व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पसरविण्यात येतील असे सांगून लोकांना मानसिक त्रास देण्याचे काम केले जाते. त्यामुळे लोकांनी आपली फसवणूक होणार नाही याबाद्दलजागृत असावे असे सांगितले.
भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक श्रीमती. योगिता बोडके म्हणाल्या, भरोसा सेलमध्ये महिला सहाय्य कक्ष आहे. त्यातून अत्याचार झालेल्या महिलांना संरक्षण देण्याचे काम केले जाते. भरकटलेल्या अल्पवयीन मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी देखील भरोसा सेल काम करत आहे. यामध्ये लोकांचे समुपदेशन करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले जाते असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. अपूर्वा गोंधळेकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती. अनिता शिंदे यांनी केले.कार्यक्रमात अनेक पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील महिलांना संस्थेची ओळखपत्रे देण्यात आली.