शहरातील 500 शिक्षकांचा सन्मान
पीईएस आणि पुणे विकास प्रतिष्ठानचे आयोजन
पुणे–पहिलीच्या आधीची तीन वर्षे संस्कारक्षम असतात, याचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश करून महत्त्व दिले असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (पी ई एस)आणि पुणे विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक गौरव पुरस्कार समारंभात पाटील बोलत होते.
शहरातील 500 हून अधिक शिक्षकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अरविंद पांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संयोजक जगदीश मुळीक, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, डॉ. गजानन एकबोटे, शेखर मुंदडा, निवेदिता एकबोटे, गणेश घोष, योगेश मुळीक, शामकांत देशमुख, वर्षा डहाळे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, ‘बुद्धिमत्तेपेक्षा चांगले वागण्याला जगात महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय माणसाची नम्रता, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती जगाला भावते. ऋजिता, नम्रता, प्रामाणिकपणा शिक्षणातून मिळतो. शिक्षकांनी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकून, अद्ययावत राहून, छोट्या छोट्या गोष्टींतून मुलांवर संस्कार केले पाहिजेत.
जगदीश मुळीक म्हणाले, शिक्षक समर्पित भावनेने विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असतात. राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे कार्य मौल्यवान आहे. समाजाने शिक्षकांना सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.
संयोजक जगदीश मुळीक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सह संयोजिका डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले आणि योगेश मुळीक यांनी आभार प्रदर्शन केले