स्व.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ कल्पनाताई आदवाडे यांना माता यशोदा सन्मान प्रदान
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन
पुणे : गोविंदा रे गोपाळा….मच गया शोर सारी नगरी रे या गाण्यांवर त्यांचेही पाय थिरकले आणि त्यांनी देखील चक्क सामान्यांप्रमाणे थरावर थर रचत दहीहंडी फोडली. शारिरीक व्यंगत्व असूनही कसबा पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात अंकुर विद्यामंदीरातील विशेष मुले सहभागी झाली आणि अतिशय आनंदात दहीहंडी उत्सव साजरा केला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै. सौ. प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील अमेय सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी अंकुर विद्यामंदिरच्या माधुरी देशपांडे, जैन सोशल ग्रुपच्या अनिता चोपडा, शाहीर हेमंतराजे मावळे, होनराज मावळे, अरुण बाभुळगावकर उपस्थित होते. साडीचोळी, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते.
यावेळी पारंपरिक वेशात मुले दहिहंडी उत्सवात सहभागी झाली होती. पाण्याचे फवारे अंगावर झेलत मनसोक्त नाचण्याचा आनंद मुलांनी यावेळी लुटला. स्व.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ विशेष मुलामुलींचे संगोपन करणाऱ्या मावशीला माता यशोदा सन्मान देतो. यावर्षी अंकुर विद्यामंदीरच्या मावशी कल्पनाताई आदवाडे यांना अनिता चोपडा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अंकुर विद्यामंदिरला गोपाळकाला म्हणून धान्य देण्यात आले.