पुणे -आज गुरूवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड, पुणे अंतर्गत पर्वतीवर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पेशवा घराण्याचे ९ वे वंशज श्रीमंत डॉ. वि. वि. तथा उदयसिंह पेशवा व सौ. जयमंगला पेशवा यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ. मेधा कुलकर्णी, संदिप खर्डेकर, सौ. माधुरी सहस्त्रबुध्दे, किशोर येनपुरे, कुंदन साठे आणि पेशवा कुटुंबियासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करतांना संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री भागवत यांनी हा पुतळा गरवारे चॅरीटेबल टस्ट्रचे अध्यक्ष शशिकांत गरवारे यांनी संस्थानला भेट दिला आहे. यामुळे पर्वतीच्या वैभवात भरच पडली आहे. संस्थानने पर्वतीवर युध्द स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला असून, आजपर्यंत देशासाठी बलिदान दिलेल्या शूर विरांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले जाणार आहे . पानिपत युध्दात धारातीर्थी पडलेल्या नामी सरदारांची तपशीलवार नावे असलेला फलक येथे लावला जाणर आहे. स्थानिक आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या आमदार निधितून पर्वतीवर विकास कामे चालू असून लवकरच पर्वती हे पुणेकरांसाठी व पर्यटकांसाठी उत्कृष्ट ऐतिहासिक स्थळ होईल असे नमूद केले. प्रा. मोहनशेटे यांनी थोरले बाजीराव पेशवा यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करतांना बाजीरावांनी दिल्लीला धडक देऊन शिव छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचा चारी दिशांनी विस्तार केला . थोरले बाजीराव यांना अजिंक्य योध्दा, रणधुरंधर, परम प्रतापी या विशेषणांनी ओळखले जाते. त्यात भर घालतांना त्यांना शिव छत्रपतींचे शिष्योत्तम असेही म्हणावे लागेल असे सांगितले .दिल्लीवर स्वारी करून दिल्ली जिंकण्याचा पराकम मराठेच करू शकले ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले. पेशवा घराण्याचे वशंज डॉ. पेशवा यांनी या कार्यक्रमास आलेल्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून या पुतळयाचे अनावरण करण्याचा मान देऊन संस्थानने आपल्याला उपकृत केल्याचे सांगितले. या पुतळयाच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अदिती अत्रे यांनी केले तर विश्वस्त श्री. सुधीर पंडित यानी सर्वांचे आभार मानले.