पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची खास मर्जी असणाऱ्या पुण्यातील 2 आरोग्य अधिकाऱ्यांची रातोरात बदली करून त्यांना जोरदार झटका दिला आहे. त्यांनी पुणे महापालिकेचे आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान पवार व पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांची बदली केली. या 2 महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, भगवान पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, रामचंद्र हंकारे यांची मुंबई येथील आरोग्य सेवा औद्योगिक विभागाच्या सहाय्यक संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अवर सचिवांनी यासंबंधीचे आदेश काढलेत. विशेष म्हणजे पवार यांची 5, तर हंकारे यांची अवघ्या 3 महिन्यांतच बदली करण्यात आली आहे.हंकारे व पवार यांच्या बदलीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही हात असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांच्या मर्जीतीलच अधिकाऱ्यांची उचलबांगडी केल्यामुळे हा तानाजी सावंत यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. भगवान पवार यांची गत 11 मार्च रोजी 2 वर्षांसाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.