पुणे, दि. 6 : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, मुंबई व विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील आधार ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्याकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वर्षा लड्डा, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तहसिलदार अंजली कुलकर्णी, मनोज जाधव, प्रकल्प संचालक दिपक शिर्के, आधार प्रशिक्षक किर्ती मदलानी, आधार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्येक तालुक्यात जावून नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्याबाबत माहिती द्यावी. प्रौढांना नवीन आधार कार्ड नोंदविणेबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य करावे. त्यांच्या जिल्ह्यातील आधार ऑपरेर्टरसना या प्रशिक्षणाबाबतची माहिती द्यावी व पुणे विभागातील आधार नोंदणीचे कामकाज गुणवत्तापूर्वक करावे, असे आवाहन उपायुक्त श्रीमती लड्डा यांनी यावेळी केले.
यावेळी पुणे विभागामधील 5 जिल्ह्यातील प्रत्येकी 25 मास्टर ट्रेनर्सला प्रशिक्षित करून, त्यांच्यामार्फत पूर्ण विभागातील आधार विषयक सुलभ कार्यप्रणाली, नवीन आव्हाने, त्यावरील उपाययोजना व आधारसंबंधित कायदे विषयक तरतूदीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.