पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले मराठा मोर्चे जगाला आदर्श घालून देणारे आणि नवा आदर्श निर्माण करणारे आहेत. अंतरवाली सराटी , जालना या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार हा लोकशाहीला काळीमा फासणारा आहे.सरकारचे लोकशाहीविरोशी धोरण आणि आबालवृद्धांवर करण्यात आलेला लाठीमार स्वातंत्र्यपूर्व काळातील जालियनवाला बाग हल्ल्याची आठवण करून देणारा होता, याला विरोध करणे हे जागरूक नागरिक या नात्याने आद्यकर्तव्य आहे. तसेच मराठा समाजाच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही कोथरूडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.अंतरवाली सराटी ( ता.अंबड) या ठिकाणी आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आले. भविष्यात असा कोणताही लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम सरकारला देण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे,अरविंद शिंदे,चंद्रकांत मोकाटे,संजय मोरे,गजानन थरकुडे,स्वप्नील दुधाने,गिरीश गुरनानी,योगेश मोकाटे ,राम थरकुडे,संगीता तिवारी, मृनाली वाणी,आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.