पुणे : बांधकामास बंदी असतानाही पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत आज पुण्येश्वर निर्माण समितीतर्फे पुणे महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण पाडून टाकवे, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, असा इशारा यावेळी भाजपचे आमदार नीतेश राणे, महेश लांडगे यांनी दिला
भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, मिलिंद एकबोटे, दीपक नागपुरे आदी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात ‘आई भवानी शक्ती ते, पुण्येश्वराला मुक्ती दे’, ‘जय श्रीराम’ यासह इतर घोषणा देण्यात आल्या.कसबा पेठेतील धार्मिक स्थळावर बांधकाम बंदी असताना मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू असून, महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.मोर्चाला संबोधित करताना नीतेश राणे म्हणाले, ‘‘या अतिक्रमणाची आम्ही वीट काढणार नाही. पण तुम्ही काढली नाही तर यापुढे महापालिकेला पत्र पाठवून विनंती केली जाणार नाही. आम्ही हे अतिक्रमण पाडण्याची तारीख जाहीर करू. कार्यकर्त्यांनी तेव्हा निरोपाची वाट न पाहता इतिहास घडविण्यासाठी तयार व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून अनेक मंदिर वाचवले, आता आपल्याला पुण्येश्वराचे मंदिर वाचवायचे आहे.महेश लांडगे म्हणाले, धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ तासाची मुदत दिली आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही जबाबदार असाल.
पुरातत्त्व विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने धार्मिक स्थळाच्या ट्रस्टला बांधकाम करू नये असे आदेश दिले होते. त्यानंतरही त्यांनी बांधकाम केले आहे. या संदर्भात आम्ही नोटीस बजावली आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलिस व इतर विभागांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.’’
– विक्रम कुमार, आयुक्त