पुणे-महावितरण मधील वरिष्ठ टेक्निशियन अधिकाऱ्याचा डोक्यात वार करुन त्याचा निघृण खून केल्याची घटना सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथे घडली आहे. गोपाळ कैलास मंडवे (वय-३२)असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आज सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गोपाळ मंडवे हे रायकर मळा परिसरातील मनोहर गार्डन जवळ, खंडोबा मंदिर रोड परिसरातून जात हाेते. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांचे मानेवर, छातीवर, मनगटावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा निघृण खून केला आहे. सिंहगड रोड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात पाठवला. नेमका काेणत्या कारणास्तव आणि काेणी सदरचा खून केला याचा अद्याप उलगडा झाला नसल्याची माहिती सिंहगड राेड पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांकडून करण्यात येत असून संबंधित खून करताना कोणी प्रत्यक्षदर्शी आहेत का याबाबतची चाचपणी करण्यात येत आहे. याबाबतचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तसेच सदर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके कार्यरत केलेली आहेत. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.