पुणे, ता. 4 : डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील ‘चिपळूणकर भवन’ येथे नव्याने सुरू केलेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळा अभियांत्रिकी, उर्जा पर्यावरण, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, बागकाम रोपवाटिका व शेती तंत्रज्ञान या विषयांतील कौशल्य प्रशिक्षण या केंद्रात दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डीईएसच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘लेंड अ हँड इंडिया’या संस्थेचे सहकार्य लाभले.
या वेळी बोलताना डॉ. कुंटे म्हणाले, डीईएसमध्ये 100 टक्के विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे संस्थेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, खेमराज रणपिसे, प्रबंधिका डॉ. सविता केळकर, प्रकल्प संयोजिका लीना तलाठी, मा. स. गोळवलकर गुरुजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर, ‘लेंड अ हँड इंडिया’चे दर्शन देवकुळे, मेधा बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.