पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यादरम्यान गुप्त खलबते झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अजय शिंदे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली आहे, यामुळे या गुप्त बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हेदेखील यापूर्वी मनसेकडून कसब्यामध्ये लढले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यामधील ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात भुवया उंचवणारी ठरणार आहे.
त्याचप्रमाणे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि विकास या मुद्द्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, तरीही मनसे कार्यकर्ते आतून धंगेकर यांचेच काम करीत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यांच्या गुप्त बैठकीमुळे धंगेकर यांना मनसेकडून मिळणारी छुपी मदत देखील बंद होईल, अशी चर्चा आहे.
सात जणांची हकालपट्टी
दरम्यान मनसे कडून कोणतीही छुपी मदत केली जात नसून मविआ चा प्रचार करताना आढळून आलेले रवींद्र खेडेकर ,सागर पांगारे,गोपी घोरपडे,,अनिल बदांगे,रिझवान मिरजकर,प्रकाश ढमढेरे ,निलेश प्रकाश निकम हे मनसेमध्ये काही वर्षांपासून कार्यरत नाहीत . मनसे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे ,आणि बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सातही जणांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे पत्रक पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रसिद्धीस पाठविल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले आहे.
