पुणे- हेल्मेट न घालण्याबद्दल २ ते ५ हजार रुपये दंड सोसावा लागणाऱ्या नागरीकांनो, या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बघ्याची भूमिका घेणाऱ्या भाजपा वाल्यांना धडा शिकवायची हीच वेळ आहे. यासाठीच रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी भरगोस मतदान करून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना विजयी करून हेल्मेट सक्तीपोटी नागरिकांची ससेहोलपट करणाऱ्या भाजपला धडा शिकवा. असे आवाहन प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पहिली कोपरा सभा प्रभाग क्रमांक २९ दत्तवाडी म्हसोबा चौक, दुसरी
कोपरा सभा प्रभाग क्रमांक २९ अबील वाडा कॉलनी आणि तिसरी कोपरा सभा प्रभाग क्रमांक १५
हिराबाग चौक येथे झाल्या. त्यात हिराबाग येथील कोपरा सभेत ते बोलत होते. या तीनही कोपरा सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मोहन जोशी पुढे म्हणाले, हेल्मेट वापरण्यावर आम्ही कधीच विरोध केला नाही. आमचा विरोध हेल्मेट सक्तीला होता. राज्यात भाजपा सत्तेवर असताना ‘पुण्यात हेल्मेट सक्ती करू नये’ या मागणीसाठी आम्ही अनेक आंदोलने केली, निदर्शने केली, निवेदने लिहिली. मात्र भाजपाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर हेल्मेट सक्तीची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरु करताच नागरिकांचे झालेले हाल आपण विसरू शकत नाही. आपल्या कसब्यातच हेल्मेट नसल्यामुळे २००० रु ते ५००० रु. दंड भरावा लागलेल्या स्त्री-पुरुष नागरिकांची संख्या कित्येक हजार आहे. त्यात तरुणांची देखील संख्या मोठी आहे. त्यामुळेच हेल्मेट न वापरल्याबद्दल २०००रु ते ५००० रु. दंड भरावा लागलेल्या कसबा मतदार संघातील प्रत्येकाने महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना मतदान करावे व भाजपाला नागरिक विरोधी भूमिका घेतल्याबद्दल धडा शिकवावा असे आवाहन मोहन जोशी यांनी शेवटी केले.