पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना या निवडणुकीत महाराष्ट्र जोशी समाज विकास संस्थेने जाहीर पाठींबा दिला आहे. तसे आशयाचे पत्र परिषदेचे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी आज कॉंग्रेस भवन येथे आमदार संग्राम थोपटे आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांना भेटून दिले. याप्रसंगी खा. वंदना चव्हाण, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार दीप्ती चवधरी, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र जोशी समाज, विकास संस्था, (महाराष्ट्र प्रदेश) या संस्थेला मानणारा व संबंधित मतदारांचा मोठा वर्ग कसबा मतदारसंघात आहे. आपल्याला विजयी करण्यासाठी या मतदारांना आपल्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आंबील ओढा कॉलनी, मंगळवार पेठ, रास्ता पेठ-गणेश पेठ आदी भागातील समाजाच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते आपल्याला मिळावी यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी आपल्या मोठ्या मनाने आपण आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश करा यासाठी आपल्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.