आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित
पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात नंबर वन राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला
महाराष्ट्राला अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी आरोग्य कार्ड बनविले जाईल असेही ते म्हणाले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य फिल्म फेस्टिवल २०२२-२३ चे आयोजन आणि पारितोषिक वितरण समारंभ बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा समारंभ पार पडला.
श्री. धीरज कुमार. आयुक्त, आरोग्य सेवा, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा, पुणे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर , डॉ. केतन खाडे, जागतिक आरोग्य संघटना, डॉ. वैशाली बिऱ्हाडे, जेएसआय, डॉ. तृप्ती शिंदे, परीक्षक म्हणून काम केलेले स्मिता वैद्यनाथन, विश्राम ढोले, डॉ. वैजयंती पटवर्धन यावेळी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, गेल्या सहा महिन्यात आमच्या सरकारने आरोग्य क्षेत्रात अनेक नवनवीन योजना राबविल्या आहेत. ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या माता आणि भगिनीसाठी राबविलेल्या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जागरूक पालक, सदृढ बालक या नव्याने सुरू झालेल्या योजनेला ही चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील सर्व सदृढ आणि निरोगी बनविण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच.
आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी आरोग्य आरोग्य योजना पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत असे सांगितले .
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले की, या महाआरोग्य फिल्म फेस्टिवल निमित्त अनेक लपलेले दिग्दर्शक पुढे येतील. सिनेमाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य शिक्षणासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो आणि आरोग्य विभागाने ते दाखवून दिले आहे.
राज्यभरातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवलसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५५ प्रवेशिका राज्यभरातून प्राप्त झाल्या. त्यापैकी ११८ प्रवेशिका आरोग्य विषयाशी निगडीत होत्या. ११८ प्रवेशिकांचे ८ परीक्षकांमार्फत परीक्षण करून गुणांकन करण्यात आले. यापैकी ५ टीव्ही स्पॉट, ५ माहितीपट असे एकूण १० विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या १० हजार रुपये, तर तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या प्रत्येकी दोन विजेत्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. उर्वरित 98 सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आली.
यातील विजेते लघुपट/माहितीपट गटात, रोहन शाह (प्रथम, साखरेपेक्षा गोड), अनुपम बर्वे (द्वितीय, गोष्ट अर्जुनाची), प्रवीण अजिनाथ खाडे (तृतीय, ताजमहाल), आर के मोशन पिक्चर (चतुर्थ, फॉरएवर), रायबा अंजली (चतुर्थ, बबाते)
टीव्ही स्पॉट गटात, राहुल सोनावणे (प्रथम, अडाणी), शैलेंद्र गायकवाड (द्वितीय, टीबी हारेगा देश जितेगा), लोकेश तामगिरे (तृतीय, साल्ट रिडकशन शोले), निखील राहुल भडकुंबे (चतुर्थ, शेतकरी), सय्यद बबलू (चतुर्थ, एंड ऑफ लाईफ).
सार्वजनिक आरोग्य विभागाने 2020 पासून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल या महोत्सवाचे आयोजन करून आरोग्य विषयक जनजागृतीसाठी लोकांचे योगदान वाढावे, तसेच चित्रपट निर्माते, निर्मिती कंपन्या, सार्वजनिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी व चित्रपट क्षेत्रात कार्य करणारे यांच्यासाठी आरोग्य या विषयावर लघुपट तयार करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी मानले सूत्र संचालन रजनी वाघ यांनी केले .
चित्रपट हे जागृती वाढविण्याचा आरोग्य शिक्षणाचा व आरोग्यदायी वर्तन सुधारण्याचा आणि कृतीला प्रोत्साहन देण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. लोकसहभागाने व भागीदारीने आरोग्य शिक्षण या संकल्पनेने महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
कल्पक उपक्रमाद्वारे आरोग्य शिक्षण लोकसहभागातून जनसामान्यांना मिळावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. स्पर्धा आयोजित करून एक मिनिट आरोग्य विषयक व्हिडिओ स्पॉट व 10 मिनिट पर्यंत माहितीपट / लघुपट याद्वारे मागविण्यात आले व या क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांकडून प्राप्त फिल्मपैकी उत्कृष्ट फिल्मची निवड करून विजेत्यांना बक्षीस स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून उपस्थिती होती.