पुणे, दि. १६: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून, उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मोहम्मद मंजरूल हसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.
खर्च निरीक्षक श्री. हसन आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक खर्च लेख्याचे पाहिले निरीक्षण १५ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले असून २० व २४ फेब्रुवारी पुढील खर्च लेखा निरीक्षण करण्यात येणार आहे.