पुणे:अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आज लाल महालात ३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार शरद पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैदिक विद्यालयात धार्मिक विधीचे प्रशिक्षण घेतलेले शिवसेवक कैलास वडघुले तसेच बाल शिवसेवक स्वरा धुमाळ यांनी राज्याभिषेक विधी पार पाडले. शस्र पूजन, शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेली फळे, धान्य यांच पूजन, छत्रपती शिवराय त्यांच्या नित्य वापरात कवड्याची माळ वापरत कवड्याच्या माळेचे पूजन, राजमुद्रेचे पूजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनी स्वराज्याचे पाहिले युवराज म्हणून शंभुराजाना घोषित विधिवत करण्यात आले होते. शंभूराजांना अभिवादन करण्यात आले. खास ३४९ व्या राज्याभिषेकासाठी बनविलेल्या सुवर्ण नाण्यांचे पूजन करून त्याच नाण्यांनी अभिषेक करण्यात आला.
‘शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे’ अस म्हणत छत्रपती ही पदवी सर्वप्रथम संत तुकाराम महाराजांनी शिवरायांना दिली त्याचं औचित्य साधून संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यामध्ये.आमदार संग्राम थोपटे, चित्रपट दिग्दर्शक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, महाराष्ट्र कॉस्मोपोलीटियन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार मॅडम, लेखक, व्याखाते संपादक ज्ञानेश महाराव, पुणे मनपाचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, माजी उपमहापौर दिपकभाऊ मानकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, आमदार रवींद्र धंगेकर याचे सन्मान करण्यात आले.

शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष सुरू होत आहे, या वर्षभरात समितीच्या वतीने ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे त्याची सुरुवात आज दोन गरजू विद्यार्थिनींना शरद पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “आजचा दिवस हा महाराष्ट्रच नाही तर देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा शिवछत्रपतींचे स्मरण आपण करत आहोत. त्यांनी स्वराज्य उभे केल्यावर राज्यकारभार स्वीकारला तो दिवस हा आजचा दिवस आहे. कारभार स्वीकारला पण राज्य कोणासाठी करायचे? तर राज्य हे सर्वसामान्यांसाठी करायचे, ही राज्यातील जनतेची शक्ती, आणि सत्ता ही जनतेसाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यापुढे ठेवले. त्याचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे.
पवार पुढे.म्हणाले,या देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांचा इतिहासही आहे. पण साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यावर देशातील राजांपैकी शिवछत्रपती हे एकच नाव निघते. त्याचे कारण त्यांनी कधीच राज्य त्यांच्यासाठी चालवले नाही. देशात अनेकांची नावे घेता येतील ज्यांनी राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चालवले. यात एकच शिवछत्रतींचा अपवाद होता. त्यांनी कधीही भोसले यांचे राज्य केले नाही, तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य तयार केले. राज्य हे रयतेसाठी चालवायचे, हा आदर्श त्यांनी संपूर्ण देशासमोर ठेवला.
सत्ता ही कशी वापरावी, कोणासाठी वापरावी याचाही आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला. शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका किंवा सोन्याच्या नांगराचा फाळ देण्याचा विचार असो.. शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी जे काही लागेल ते देण्यासाठी सत्ता, असे त्यांचे सूत्र होते. म्हणून त्यांनी कष्टाने, घामाने, त्यागाने, शौर्याने राज्य प्रस्थापित केले. ते राज्य ग्रहण करण्याचा ऐतिहासिक सोहळा झाला.काही घटकांनी त्याला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. पण या देशातील सामान्य माणसाने पहिल्यांदा आपला राजा हा सत्तेवर बसलेला पाहिला. त्याचा सन्मान, त्याचे स्वागत ही भूमिका अंत:करणापासून स्वीकारली. जनतेच्या अंत:करणात स्थान प्राप्त करून घेणारे असे आदर्श राजे आणि त्यांच्या सत्ताग्रहणाचा आनंद सोहळा विशेषत: लाल महालात होतोय यालाही एक इतिहास आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.