पुणे, दि. ०६ जून २०२३: महावितरणच्या रास्तापेठ येथील पुणे परिमंडलाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचे मंगळवारी (दि. ६) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते अनावरण झाले.
महावितरण व महापारेषणमधील सर्व कर्मचारी संघटनांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, डॉ. सुरेश वानखेडे, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सिद्धार्थ धिवार यांनी हे दोन्ही तैलचित्र चितारले आहे. यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुकर केले. जनतेला अभिमानाने जगणे शिकविले. माणुसकीच्या धर्माची शिकवण दिली. महावितरणचा देखील खरा केंद्रबिंदू जनता म्हणजेच वीजग्राहकच आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना महावितरणचा अभिमान वाटेल अशी तत्पर व दर्जेदार सेवा द्यावी असे आवाहन यावेळी श्री. पवार यांनी केले.
कार्यकारी अभियंता श्री. भागवत थेटे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी डॉ. संजय घोडके, विश्वास भोसले, ईश्वर वाबळे, बाबा शिंदे, भीमाशंकर पोहेकर, वसंत ढवळे, भरत अभंग, विजय गुलदगड, किशोर अहिवळे, राजेश गाढवे, सुरेश जाधव, आनंद शिर्के आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.