पुणे- तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ४८, ता. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांची शुक्रवारी (ता. १२) दुपारी पावनेदोनच्या सुमारास गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आली. या प्रकरणी आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर व त्याचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे यांनी फिर्याद दिली आहे.
किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. विशेष म्हणजे किशोर आवारे सुद्धा राजकारणात सक्रिय होते. त्यामुळेच त्यांचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यात अनेकदा खटके उडायचे. त्यामुळे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे किशोर आवारे यांनी आपल्या आईला सांगितले होते.
किशोर आवारे यांनी स्वतःचा वेगळा गट केला होता. त्यांनी आमदार सुनील शेळकेंच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांबाबत आंदोलनही केले होते. शिवाय ते संतोष शेळके यांच्यासोबत फिरत. आवारे यांचे वाढते राजकीय प्रस्थ पाहता त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
किशोर आवारे शुक्रवारी दुपारी मारुती मंदिरे येथील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेले होते. मुख्याधिकारी यांना भेटून झाल्यानंतर ते नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला, तर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. त्यात श्याम निगडकर आणि त्याचे तीन साथीदार असल्याचे समजते.
हल्ल्यात आवारे गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. आवारे यांना सोमाटणे फाटा येथील पावना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हल्ल्याची माहिती मिळताच, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.