…अन् त्यांनीही अनुभविला ह्रद्य विवाहसोहळा
सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार
पुणे : सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी व-हाडी मंडळी… देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठया हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत… आणि आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवित अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन बांधव अशा ह्रद्य वातावरणात दृष्टीहिन वधू-वरांनी विवाहसोहळा अनुभवला. डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचे प्रेम आणि आपुलकीने त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे दोन दृष्टिहीन मुला – मुलींच्या अनोख्या विवाह सोहळ्याचे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर, खडक पोलीस स्टेशनचे गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, राजाभाऊ कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

चंदूकाका सराफ पेढीचे संचालक सिद्धार्थ शहा व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी हेमंत गोसावी यांनी सपत्नीक कन्यादान केले. मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष सागर कुलकर्णी, अमर लांडे, सचिन ससाणे, उमेश कांबळे, योगेश पासलकर, तन्मय तोडमल, साहिल आंबेडकर, सदाशिव कुंदेन, शेखर देडगावकर आदिंनी आयोजनात सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यातील महेश घोडपडे यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मैना राजोरे यांच्याशी झाला. तर रायगड जिल्ह्यातील नीरज कोळी यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील रेखा सोनवणे यांच्याशी झाला. दोन्ही वधू -वरांचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे. मामा मंडळी व पुणेकरांतर्फे नवविवाहित जोडप्याना संसारासाठी लागणारे सर्व साहित्य भेट देण्यात आले.
सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेच्या सहकार्याने हा विवाह सोहळा पार पडला. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून सर्व जबाबदारी पाडली. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.