पुणे : जगतज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९२ वी जयंती तसेच श्री श्री श्री जगदगुरु एकोरामाराध्य आणि चैत्र शुद्ध पंचमीला श्री श्री श्री जगदगुरु मरूळाराध्य यांचा प्रकट दिन अश्या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून हिंदू वीरशैव लिंगायत मंच या वीरशैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बसवेश्वर महाराज यांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली.

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखेतर्फे बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योजक महेश कुगांवकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सयोजक शरद गंजीवाले, सहसंयोजक अविनाश कुलकर्णी, पुणे महानगर सचिव अतुल सरडे, सुभाष जेयुर, ऍड. वैजनाथ विंचूरकर, अमोल महांकाळे, रामलिंग शिवणगे, आशिष हिंगमिरे आदी उपस्थित होते. महिलांच्या हस्ते प्रतिमांना औक्षण करून आरती देखील करण्यात आली.

महेश कुगांवकर म्हणाले, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे अनुकरण आपण करायला हवे. बसवेश्वर महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण सर्वधर्म समभावाची आहे. त्याप्रमाणे सर्वाना एकत्र घेऊन चालणे आज गरजेचे आहे. प्रत्येकाला माणसाची गरज असते. त्यामुळे सर्वानी समाजाला धरून एकमेकांची प्रगती साधायला हवी, असेही त्यांनी सांगितले.