पुणे- मार्केट यार्डातील प्रस्तावित फुलबाजाराची शिरूर, हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यानी प्रस्तावित फुलबाजारातील अडचणींचा पाडाच त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे त्यांना निवेदन देण्यात आले. यावर चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
त्यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, अखिल पुणे
फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर, सागर भोसले, बापू कड आदी उपस्थित होते
पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आडत्यांनी मागणी केल्याप्रमाणे फुलबाजार बांधण्यात आलेला नाही. नवीन फुलबाजार बांधताना ठराविकच लोकांना विश्वासात घेतले असून इतरांचा विचार केला नाही. बाजार समितीने आडत्यांकडून एक लाख रुपये अनामत रक्कम घेतली आहे.
ही रक्कम आडत्यांनी स्वखुशीने दिलेली नाही. फुलांच्या बाजार हा गोलाकार आसावा. त्यामध्ये प्रत्येकाला समोरील भाग सारखा असावा. प्रत्येकाला सारखे गाळे असावेत. जागा वाढवून देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आला नाही. सध्याच्या जागेपेक्षा नवीन बाजारात कमी जागा मिळणार आहे. नवीन फुलबाजारात दहा मजल्यांचा असणार आहे. त्यामुळे नवीन बाजारात आवक जास्त झाल्यास बाजार विस्कळीत होईल.
पहिला गाळा सहाव्या मजल्यावर येत आहे. पाचव्या मजल्यावर ऑक्शन हॉल शेतकऱ्यांनी विकल्यावर आमच्याकडे सहाव्या मजल्यावर शेतकरी कसे येणार आणि एवढी मोठी किंमत देवून आम्ही गाळे विकत तरी कशासाठी घ्यायचे, असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला