पुणे- शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. चौघांना आज शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात भोसले यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मंगळवारी आमदार अनिल भोसले, एस.व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ आणि अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली. आमदार अनिल भोसले हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांची पत्नी रेश्मा या भाजपच्या नगरसेविका आहेत.
बँकेतील रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या नोंदी खऱ्या असल्याचे भासविण्यात आले. या खोट्या नोंदीच्या माध्यमातून 71 कोटी 78 लाख 87 हजार 723 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी 11 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश लकडे यांनी फिर्याद दिली आहे.