पुणे- शहरातील ढासळती आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्यावतीने ” पुण्यातील आरोग्य यंत्रणेची अंतयात्रा आंदोलन ” करण्यात आले . पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आले .
पुण्यातील आरोग्य व्यवस्था ढासळली असून कोरोना संसर्गावर नियंत्रण राखण्यास पुणे महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे . संपूर्ण देशभरात आपला सर्वांगीण विकास , आर्थिक प्रगती करीत पुणे नावारूपाला आले असताना आधुनिक आणि प्रगत असलेल्या पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणे हि बाब अत्यन्त लाजिरवाणी आणि शरमेची आहे .
रोजच्या रोज कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण करणे प्रशासनाकडून शक्य होत नाही . रुग्णांना बेड नाही , ऑक्सिजन मिळत नाही , पर्याप्त औषधोपचार नाही , तज्ञ व कुशल डॉकटर्स , कर्मचारी वर्ग नाही , खाजगी हॉस्पिटलची लूट सुरु आहे , रुग्णांना जेवणाची व्यवस्था योग्य नाही , मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे , जम्बो हॉस्पिटलमध्ये भ्रष्ट्राचार झाला असून संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली आहे . यामुळे सामान्य नागरिकांचा आरोग्य यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे . याविषयी आपण तात्काळ कार्यवाही करून आरोग्य यंत्रणेमध्ये सर्वोच्च सुधारणा कराव्यात व नागरिकांच्या रागाचा विस्फोट होण्याची शक्यता असून नागरिक रस्त्यावर येऊन आपला विरोध आणि निषेध व्यक्त करतील व प्रशासनास त्यांना नियंत्रण करणे शक्य होणार नाही , असे निवेदनात देण्यात आले .
या आंदोलनात भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे पुणे जिल्हाध्यक्षा नीता आडसुळे , उपाध्यक्षा उषा राजगुरू , पुणे शहर कार्याध्यक्षा स्वाती गायकवाड , प्रदीप कांबळे , राहुल बनसोडे , मुकेश गायकवाड , भीमराव कांबळे , कन्हेय्या पाटोळे , जालिंदर वाघमारे , निरंजन कांबळे , मामा बनसोडे , नितेश निकम , बाळू गायकवाड , अमित गायकवाड , अश्रफ खान , आकाश गंडगुले आदी उपस्थित होते .
यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले कि , आम्ही सक्षमपणे काम करू , यावर उपाय योजना म्हणून रोज ५० बेड वाढवीत आहोत . पुणे आसपास परिसरातून रुग्ण येत असल्यामुळे पुण्यात पुणेकरांना बेड मिळणे अवघड होत आहे . यावरचआम्ही उपाय योजना करीत आहोत .