पुणे-पंजाबी कल्चरल असोसिएशन व शीख जनसेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ” बैसाखी दी रौनक ” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . पुणे लष्कर भागातील कोयाजी रोडवरील हॉटेल शीतल आर्चमध्ये झालेल्या या कार्यक्रमास उद्योजक बारी मल्होत्रा , महापौर मुक्ता टिळक ,माजी आमदार मोहन जोशी , शीख जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा , सेक्रेटरी चरणजितसिंग सहानी , पंजाबी कल्चरल असोसिएशनचे काश्मिरी नागपाल , अजितसिंग राजपाल,जगजितसिंग खालसा ,लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले , काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे , सतीश चढ्ढा ,संजय नहार ,दीपक कुदळे , बॉबी म्यानी , इंद्रजितसिंग सहानी , संदीप खर्डेकर , अशोक आगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमात पंजाबी कल्चरल असोसिएशनच्यावतीने स्मरणिकेचे प्रकाशन उद्योजक दीपक कुदळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . यामध्ये पंजाबी गाण्यावरील लोकनृत्य सादर करण्यात आले . तसेच भांगडा नृत्यावर सर्वानी नृत्याचा आनंद लुटला . यामध्ये पंजाबी व शीख समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
पंजाबमध्ये आपल्या शेतामध्ये पिके चांगली आल्यानंतर तेथील शेतकरी बांधव आनंदोत्सव साजरा करतात , त्याला बैसाखी म्हटले जाते , तो आनंदोत्सव आज पुण्यातील पंजाबी व शीख समाज बांधव एकत्रित येऊन साजरा करीत आहे , अशी माहिती शीख जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांनी दिली . यावेळी उद्योजक बारी मल्होत्रा यांनी सांगितले कि , पंजाबी इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशनची सुरुवात पुणे शहरातून करता येईल . यामध्ये जगातील सर्व पंजाबी बांधवाना एकत्रित आणता येईल . त्याचा नावलौकिक जगात करू .
या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत पंजाबी कल्चरल असोसिएशनचे काश्मिरी नागपाल यांनी केले तर सूत्रसंचालन शीख जनसेवा संघाचे सेक्रेटरी चरणजितसिंग सहानी यांनी केले तर आभार अजितसिंग राजपाल यांनी मानले .