श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन समारंभ ६ एप्रिल रोजी
पुणे- एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा चैत्र शुध्द प्रतिपदा, नववर्षदिन, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, शनिवार, दि. ६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे संपन्न होणार आहे. तसेच
ज्येष्ठ समाजसेवक, लोकपाल व माहिती अधिकार विधेयकाचे प्रणेते पद्मभूषण मा.श्री. अण्णा हजारे हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संत वृत्तीचे थोर शास्त्रज्ञ आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण मा.डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाच्या प्रवेशद्वाराशी ‘दिव्य ज्ञान-यज्ञ कुंड’ उभारण्यात आले. त्यातील ज्ञानज्योतीचे सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन करतील. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनेसह सदरील श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन होणार आहे.
याच्या उद्घाटन प्रसंगी जागतिक कीर्तीचे अस्थिरोग तज्ञ व विद्वान पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, माजी केंद्रीय मंत्री आरिफ महंमद खान, हैद्राबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. फिरोज बख्त अहमद, ज्येष्ठ कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम, पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त, दिलीप देशमुख, माजी खासदार व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विठ्ठलराव जाधव, अ.भा.म.सा. सम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रतापराव बोराडे हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शुभाशीर्वाद देण्यासाठी महान साधक व चिंतक प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरूजी, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्त गाडगीळ, पुणे येथील स्पायसर अॅडव्हेटिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवन अरसूड, बौध्द धर्माचे गाढे अभ्यासक भंते नागघोष, शीख धर्माचे गाढे अभ्यासक ग्यानी अमरजित सिंग, जैन धर्माचे गाढे अभ्यासक आर.एन. शुक्ल, मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष ह.भ.प.श्री. रामेश्वर शास्त्री, झोरास्ट्रियन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. मेहेर मास्टर मूस आणि ज्यू धर्माचे विद्वान डॉ. आयझॅक मळेकर हे उपस्थित राहणार आहेत.
ज्ञान विज्ञानधिष्ठित वैश्विक भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानालचा, मानवता, सहिष्णूता, विश्वशांती आणि ‘ एकं सत विप्रा बहुधा वंदती’ व ‘वसुधैव कुटुंबकम’ असा संदेश देणार्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्व शांती सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेले आणि ‘ संपूर्ण जगातील धर्मग्रंथ हे खर्या अर्थाने जीवनग्रंथ आहेत’, हा विश्वकल्याणाचा संदेश देणारे श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचा हा उद्घाटन सोहळा आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, इंडिया इंटरनॅशनल मल्टिर्व्हसिटीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम. पठाण, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव आणि मिटसॉटचे प्रकल्प संचालक प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.