मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे आयोजन ; दिव्यांग, मूकबधिर, कर्णबधिर मुलांच्या चेह-यावर हास्य
पुणे : समाजातील प्रत्येक घटक ज्या आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीचा सण साजरा करतो, तसेच समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या दिव्यांग, दृष्टीहिन, मूकबधिर, कर्णबधिर अशा विशेष मुलांना सण-उत्सवाचा आनंद देण्याकरीता तरुणाईने पुढाकार घेतला. नवीन कपडे, फराळ, भेटवस्तू देऊन या ५०० चिमुकल्यांसोबत पणत्या रंगवून पुण्यात विशेष दिवाळी साजरी झाली.
मैत्र युवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने सेवासदन दिलासा कार्यशाळा, सेवासदन दिलासा केंद्र, जीवनधारा, सहेली आणि बालसदन या पाच संस्थांमध्ये विशेष दिवाळी उत्सव साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, अर्चना क्षीरसागर, चिंतामणी पटवर्धन, तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, मेघना जोशी, संगिता नागपूरकर, संतोष डिंबळे, पद्मजी कुलकर्णी, करुणा गायकवाड, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी उपस्थित होते.
समाजातील विविध दिग्गजांनी पणती रंगवून विशेष दिवाळी उत्सवात सहभाग घेतला. शिक्षण, कला, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रितपणे विशेष मुलांसोबत पणती रंगवून चिमुकल्यांना भेटवस्तू देत सण करु साजरे, माध्यम जरा वेगळे असा संदेशही दिला.
संकेत देशपांडे म्हणाले, एक पणती तिच्यासाठी या उपक्रमांतर्गत त्यांच्यासोबत पणत्या रंगविण्यात आल्या. विविध संस्थांतील मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा, याकरीता पणत्या आणि नवे कपडे देण्यात आले. वर्षभर या मुलांसाठी विविध उपक्रम, संस्कार वर्ग राबविले जातात. मात्र, दिवाळी हा त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा सण असतो आणि समाजातील प्रत्येक घटक यामध्ये आम्हाला साथ देतो, असेही ते म्हणाले.