पुणे : पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने आपल्या प्रचाराचा नारळ कसबा गणपती मंदिरात फोडला. यावेळी फटाक्यांची आताषबाजी, बँड वादन, पक्षाचे झेंडे, गली गली में शोर हे चौकीदार चोर है सारख्या घोषणा यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा सुरुवात झाली. पक्षाकडून कुणाही उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे विना उमेदवार आणि सर्व इच्छुक उमेदवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पक्षाच्या वाटचालीस सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर , मोहन जोशी, दीप्ती चौधरी,कमल व्यवहारे,प्रवीण गायकवाड , अरविंद शिंदे,अभय छाजेड ,अविनाश बागवे, डॉ. सतीश देसाई ,काका धर्मावत,रवी धंगेकर ,बाळासाहेब अमराळे ,द.स. कोळेकर,सोनाली मारणे यांच्यासह राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण, चेतन तुपे पाटील ,कमल ढोले पाटील ,अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर ,डॉ. सुनिता पवार आदी नेते उपस्थित होते.अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड या दोहोंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती .
काँग्रेस नेतृत्वाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.तरीही काँग्रेसचा प्रचाराचा नारळ उमेदवाराशिवाय फोडण्यात आला आहे. उमेदवार जाहीर झाला नसला तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात येईल, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले होते.
पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार शहर काँग्रेसने रविवारी सुट्टीची संधी साधून प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन केले होते. दुपारी ४.१५ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढली गेली मात्र दिल्लीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. याच ठिकाणी भाजपचे गिरीश बापट यांचे कार्यालय देखील आहे.या बालेकिल्यातूनच प्रचाराचा नारळ फोडला गेला . त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मागार्ने पदयात्रा काढण्यात आली नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ समारोप झाला . पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले गेले आहे. त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन करण्यात आले होते . राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकतेर्ही या पदयात्रेत सहभागी झाले होते .