शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन : ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने ‘पुणे कीर्तन महोत्सव २०२२ – कथा रणधुरंधरांच्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ ते ५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी ६ वाजता कसबा पेठेतील ऐतिहासिक लाल महालात हा कीर्तन महोत्सव होणार आहे, अशी माहिती शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.
किर्तन महोत्सवात सोमवार दिनांक ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता कीर्तन कोविद ह.भ.प. स्व. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांना श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
दिनांक ३ आणि ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे कीर्तन होणार आहे. तर दिनांक ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन होणार आहे. विक्रमादित्य, सरसेनापती उमाबाई दाभाडे, पृथ्वीराज चौहान यांच्या कथा कीर्तनातून सांगण्यात येणार आहेत. यावेळी त्यांना उदय शहापूरकर (हार्मोनियम) होनराज मावळे (तबला) साथ संगत करणार आहेत.