पुणे – राज्यात करोनाची दुसरी लाट सुरु असून राज्य सरकारकडून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून पुणे शहरासाठी नियमावली जाहीर करून कडक अंमलबजावणी सुरु आहे. अशातच आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. या नुसार मद्यविक्रीची दुकाने पार्सल सुविधा देण्यासाठी सोमवार पासून सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सुरु राहणार आहेत . जाणून घ्या सुधारित आदेश…
- – सर्व ऑक्सिजन प्रोड्यूसर कंपन्यांनी 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. त्यांनी ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे यांची यादी प्रसिद्ध करावी.
- – पुणे महानगरपालिक क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना परवानगी दिलेली आहे अशा कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरु ठेवता येतील. त्यांना इतर किरकोळ विक्री करता येणार नाही. त्यांनी Point to Point विक्री करावी.
- – खालील आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना कोविड 19 चाचणी करणेपासून सूट देण्यात येत आहे.
- ई-काॅमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी.
- हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट यांचे कर्मचारी तसेच त्यांचे मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी.
- खासगी वाहतूक करणारे वाहन चालक \ मालक.
- दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीन मासिके, साप्ताहिक इ. ची छपाई व वितरण करणारे कर्मचारी.
- घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस\नर्स.
- तथापी त्यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
- – पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील.
- – चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील.
- – संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश \ मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
- – पुणे महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश \ मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.