पुणे, ता. २२ : लेफ्टनंट कर्नल अनंत सदाशिव गोखले (वय ७६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मार्च १९६८ मधील गार्डसच्या १३ व्या बटालियन ब्रिगेडचे ते पहिले कमिशण्ड ऑफीसर होते. १९९७ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत भारतीय लष्कराच्या सर्व मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. १९७१ मधील ऑपरेशन कॅक्टस लिली अर्थात बांगलादेश मुक्ती संग्राममधील पूर्व पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाचा कैदी लेफ्टनंट जनरल एसके नियाझी यांच्या नजरकैदेची अत्यंत जोखमीची जबाबदारी गोखले यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. १९८८-८९ च्या श्रीलंकेमधील ऑपरेशन पवनमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. इनफन्ट्री ऑफसर म्हणून ३० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे पहिले कमांडर म्हणून काम पाहिले. सिंबायोसिस इन्सिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंटचे रजिस्ट्रार आणि महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजुरपागा शाळेच्या कार्यकारीणी समितीचे सदस्य व अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, दोन जावई, नातवंडे असा परिवार आहे.